28 फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि आम्ही भारतीय?

National science day
National Science day and we Indians

ज्या विषयाच्या विकासामुळे संपूर्ण मानव जातच नाही तर या संपूर्ण विश्वाचा कायापालट झाला तो विषय म्हणजे विज्ञान.

रानटी अवस्थेत सर्वत्र फिरणाऱ्या मनुष्यामध्ये परिवर्तनाचं स्फुल्लिंग पेटवणारं तत्त्वज्ञान म्हणजे विज्ञान. श्रीमंत वा गरीब, लहान वा मोठा, या धर्माचा वा त्या धर्माचा असा भेद न करता सर्वांना समानतेने वागणारा आणि सर्वांचे जीवन सुखमय करणारा सर्वांचा साथिदार म्हणजे विज्ञान.

प्रत्येक घटनेमागे असलेला तर्क शोधत व्यक्तीमधील चिकित्सकतेला वाव देणारं शास्त्र म्हणजे विज्ञान. 

राष्ट्रीय विज्ञान दिन


Chandrashekhar venkat raman
Source: Chandrashekhar Venkat Raman (Navbharat)

आज संपूर्ण भारत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करीत आहे. महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकशास्त्राच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता.

पारदर्शी पदार्थांमधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते.

हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

National science day (Weebly.com)

प्रस्तुत दिवस साजरा करताना आपण विज्ञानाच्या विकासाची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. आपल्या संपूर्ण समाजामध्ये दोन प्रकारची मदत ही जनमाणसात खोलवर रुजलेली आहेत. एक म्हणजे धार्मिक मत आणि दुसरी म्हणजे वैज्ञानिक मत.

धार्मिक मत ही तुम्हाला चिकित्सा करायला भाग पाडत नाहीत आणि वैज्ञानिक मत तुम्हाला चिकित्सा केल्याशिवाय समोर जाऊ देत नाही. दोन्ही मता मधला हा महत्त्वपूर्ण फरक आहे.

उदाहरणादाखल आपण कोपर्निकस अथवा गॅलेलियो यांची उदाहरनं घेऊ शकतो. कोपर्निकस ला ” सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते ” आणि गॅलिलिओला “दोन वेगवेगळ्या वस्तुमान असलेल्या वस्तू समान उंचीवरून जमिनीच्या पृष्ठभागाकडे एकाच वेळीस सोडल्यास त्या एकाच वेळी खाली पडतात” हे समजावून सांगताना प्रचंड त्रास झाला.

त्यांना मानसिक त्रास तर सहन करावा लागलाच परंतु त्यासोबत त्यावेळी त्यांची प्रचंड मानहानी देखील झाली. परंतु ह्याच्या उलट जी धार्मिक मत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पेरल्या गेली होती, अशा मतांना कधीही विरोध झालेला ऐकिवात नाही. आपण याचे दुसरे उदाहरण घेऊ.

राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि आम्ही भारतीय

भारतामधील प्रत्येक नागरिकाला याची कल्पना होती की थाळी वाजवल्याने अथवा दिवे लावल्याने कोरोना बहिरा होणार नाही किंवा मरणार नाही. परंतु तरी देखील लोकांनी थाळी वाजवली, दिवे लावले.


Source: Google

परंतु त्याच वेळी व्हाट्सअप विद्यापीठामधून अनेक प्रकारचे अवाजवी, अवैज्ञानिक, तर्क नसलेले संदेश कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेत आणि थाळी वाजवल्याने आणि दिवे लावल्याने तापमानामध्ये वाढ होऊन कोरोना कशापद्धतीने नष्ट होईल, अशा भंपक गोष्टी लोकांना सांगण्यात आल्या.

झालं नेमकं काय की लोक देखील चिकित्सा न करता त्यावर विश्वास ठेवायला लागले.

ज्या दिवशी राष्ट्रीय थाळी वाजवणे – दिवे लावणे दिवस आयोजित केला होता त्या दिवशी थाळी वाजवली अथवा दिवे लावले नाहीत अशा काही कुटुंबांना मारहाण करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना देशांमधील जनता विज्ञानप्रती किती अज्ञानी – असंवेदनशील आहे, हे दाखवून देतात.

विज्ञान दिवस , आम्ही भारतीय आणि कोरोना

दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याच्या मृत शरीरास अग्नि देणे किंवा मृत्यु संस्कार करणे हे प्रत्येक धर्मामध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये असतेच.

मृत्यु संस्कार केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळते, असा त्यामागचा तर्क. बरं मग मला सांगा की जी माणसं कोरोना मुळे मृत्युमुखी पडली, अशा व्यक्तीच्या मृत्यू संस्कारासाठी कुठलाही धर्म समोर येत नाही आहे. याचा अर्थ तरी काय?


Temples closed
Source: Google Images

कोरोना चा प्रसार झाल्यानंतर आणि त्याच्या अक्राळ विक्राळ विस्तारानंतर जगातील सर्व ठिकाणांची सर्व धार्मिक स्थळ बंद करण्यात आली होती.

अशा वेळी प्रत्येकाच्या मदतीला धावून आलं ते म्हणजे विज्ञान. विज्ञानामुळे प्रगत झालेलं आरोग्य शास्त्र आणि औषध शास्त्र कोरोनाशी पूर्ण शर्तीने मुकाबला करीत आहे.

ज्या लसीची वाट संपूर्ण विश्व पाहत आहे ति देखील विज्ञानाच्या सहाय्यानेच तयार करण्यात येईल.

असे असताना कुठलाही धर्म, कुठलीही धार्मिक स्थळ, कुठलेही धार्मिक ग्रंथ, कुठलेही धार्मिक तर्क कामी येताना दिसत नाही आहेत. परंतु एकदा का लस निर्माण झाली, कि ती कशाप्रकारे अमुक देवाच्या प्रसन्नतेचे मुळे निर्माण झाली हे सांगायला अनेक धर्ममार्तंड जन्माला येतील आणि त्यांच्या सांगण्यावर आपली बुद्धी गहाण ठेवून लोक विश्वास ठेवतील.

धर्म , विज्ञान आणि अंधश्रद्धा


Source: Younginvestigator

महाराष्ट्र खरच पुण्यवान राज्य आहे जेथे संतांनी धर्माला विज्ञानाची जोड दिली. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांमधून विज्ञानवादी विचार मांडताना दिसतात. ते म्हणतात ” नवसे कन्या पुत्र होती, तो का करणे लागे पती?” . जर एखाद्या देवाला नवस केल्याने संतान प्राप्ती होत असेल तर ?

असा समर्पक विज्ञानवादी आणि खोचक प्रश्न संत तुकाराम महाराज आपल्या श्रोत्यांना विचारतात आणि त्यांना अंधश्रद्धेपासून दूर राहायला सांगतात.

अनेक नामांकित विद्यापीठाचे प्राध्यापक देखील आपल्या घराचं बांधकाम करण्यासाठी वास्तुशास्त्रज्ञाशी सल्लामसलत करतात. आपल्या घराचं दार कोणत्या दिशेने असलं पाहिजे हेच या प्राध्यापकांना समजत नाही त्यांच्याकडून विज्ञानाची अपेक्षा करण म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे.

काही दिवसांपूर्वी आपण फ्रान्स कडून राफेल विमान खरेदी केलेत. या विमानांना काही होऊ नये म्हणून त्याला निंबु मिरची आपल्या संरक्षणमंत्र्यांनी बांधली. आणि ते करतानाचे व्हिडीओ संपूर्ण जगात लोकांनी पाहिलीत. एकीकडे विज्ञानाच्या साहाय्याने तयार झालेलं राफेल विमान आपण हजारो कोटी रुपये खर्च करून विकत घ्यायचं आणि त्याची सुरक्षा व्हावी यासाठी दहा रुपयांची निंबु मिरची लावायची, म्हणजे किती हा मूर्खपणा.

विज्ञानवादी दृष्टिकोन आणि बुद्धी स्वतंत्र​

विज्ञानवादी दृष्टिकोन जन्माला येईल यासाठी आमची बुद्धी स्वतंत्र असायला हवी. बुद्धीला विचार करायला प्रेरणा मिळायला हवी. परंतु आपल्या देशामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य असले तरीही बौद्धिक पारतंत्र्य आहे.

न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडलं आणि त्याने विचार केला की सफरचंद वरून खाली आलं परंतु खालून वर गेल नाही. त्यातून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जन्माला आला. त्यापूर्वी हजारो वर्ष आम्हा भारतीयांच्या डोक्यावर आंबे, संत्र, चिकू, नारळ कित्येक वेळा पडली परंतु बौद्धिक पारतंत्र्यामुळे आम्ही कधीही त्याची वैज्ञानिक चिकित्सा केलीच नाही.

जेम्स वॅट ने उकळत्या पाण्यावर ठेवलेले भांडे पाण्याच्या वाफेमुळे वर जातं यावर विचार करून वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, परंतु त्यापूर्वी भारतामध्ये हजारो वर्ष डाळ शिजवताना, दूध तापवताना, भाजी करताना कित्येक वेळा भांड पाण्याच्या वाफेमुळे खाली पडलं परंतु बौद्धिक पारतंत्र्यामुळे त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्नच केला नाही.

बरं आज परिस्थिती बदलली असेल असेही नाही. आज सर्व संसाधने उपलब्ध असताना देखील आम्ही विज्ञानाचा अभ्यास केवळ परीक्षा पुरता करीत आहोत. घोकंपट्टी करून परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान सन्मान मिळतो आणि आपला तर्क लावून शिक्षकांना प्रश्न विचारणाऱ्या पण परीक्षेमध्ये कमी मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला “काय मुर्खासारखी प्रश्न विचारतो?” असे म्हणून आम्ही गप्प करतो.

यामुळेच आपल्या भारत देशात वैज्ञानिकांची कमतरता आढळते. अन्यथा भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार इथे वैज्ञानिकांची मांदियाळी असायला हवी. दुर्दैवाने चंद्रयान प्रक्षेपण करण्यापूर्वी त्याचे यशस्वी उड्डाण व्हावे यासाठी बालाजी मंदिरात पूजा अर्चना करणारे इस्त्रोचे अध्यक्षच आपला विज्ञानावरील अविश्वास प्रकट करतात. जिथे इस्रोचे अध्यक्षच चंद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भगवंताकडे मागणी करतात त्या देशात वैज्ञानिकतेला वाव  मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

 

National science day
Source: VK Raman (Google Images)

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करीत असताना प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून आयुष्य व्यतीत करावे. अन्यथा आपले राष्ट्र अधोगतीला लागल्याशिवाय राहणार नाही. वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम झाल्यास भारत नक्कीच जागतिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या सर्वांना विज्ञान दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

Mahesh Devle

Author and Editor

I am Mahesh Devle.  Author, Creator and Life student. I love exploring things and I am one of those who believes even a little change can make a big impact. Part of Kriya Speak team and key member.

Post a Comment

0 Comments